MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! अकॅडमी संचालकासह 5 जण ताब्यात; तपासात काय समोर आलं?

मुंबई : MPSC औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात तपासाला वेग आला असून नंदुरबारमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पेपरफुटीसाठी तब्बल 5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात कौटिल्य अकॅडमीचे संचालक आणि परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासह काही जणांची चौकशी सुरू आहे.
नंदुरबारमधील या प्रकरणात कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेली ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि गौरवच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात MPSCचा सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांचेही नाव समोर आले आहे. ते नंदुरबार तालुक्यातील धामळोड गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी नंदुरबार येथील कौटिल्य अकॅडमीमधून MPSC पूर्व परीक्षेची तयारी केल्याचेही समोर आले आहे.


दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणात नंदुरबारमधून आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पेपरफुटीमागे प्रेमसंबंधाचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती आहे.
गौरव पाटीलच्या मोबाईलमधून मिळणार महत्त्वाचे धागेदोरे?
तपासाचा एक महत्त्वाचा भाग गौरव पाटील यांच्या मोबाईलभोवती केंद्रित झाला आहे. मुंबई पोलिसांकडून गौरव यांच्या मोबाईलची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी पोलिसांकडून त्यांच्या वडिलांचीही चौकशी करण्यात येत आहे. मोबाईलमधून पेपरफुटीशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे किंवा संपर्क समोर येतात का, याकडे तपास यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
ऋतुजाच्या वडिलांना मिळाला होता ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार
या प्रकरणातील संशयित ऋतुजा पाटील यांचे वडील अमृत पाटील यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. अमृत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून 2023-24 या वर्षासाठी त्यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, आता त्यांचे नाव MPSC औषध निरीक्षक पदाच्या कथित पेपरफुटी प्रकरणातील चौकशीत समोर आल्याने या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
पेपरफुटी नेमकी कशी झाली, त्यामागे कोण कोण सहभागी आहेत आणि 5 लाखांच्या कथित व्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.