एसटी महामंडळाचा मोठा ॲक्शन! एकाचवेळी ११ अधिकाऱ्यांचे निलंबन; क्लास वन अधिकाऱ्यांवरही कारवाई…

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा, नियमांचे उल्लंघन आणि प्रशासकीय त्रुटी आढळून आल्याने एकूण 12 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळात मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखेडे यांना कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याचा तसेच कामकाजात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून, दोष सिद्ध झाल्यास त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई होऊ शकते.
दरम्यान, नाशिक विभागातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. कामकाजातील गंभीर त्रुटी आणि हलगर्जीपणामुळे तब्बल 11 अधिकाऱ्यांना एकाचवेळी निलंबित करण्यात आले आहे. यात 3 वर्ग-1 आणि 8 वर्ग-2 अधिकाऱ्यांचा समावेश असून दोन आगार व्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवणे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने मुख्यालयाने विशेष नियंत्रण समितीची स्थापना केली होती. 10 जून रोजी या समितीने नाशिक विभागातील विविध कार्यालयांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक अधिकाऱ्यांच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्याने समितीच्या अहवालाच्या आधारे ही सामूहिक निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महामंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाचे आदेश तातडीने स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. आदेश स्वीकारण्यास नकार दिल्यास ते थेट पोस्टाद्वारे संबंधितांच्या पत्त्यावर पाठवले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या धडक कारवाईमुळे एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर भूमिका कायम राहणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.