महाराष्ट्र पुन्हा हादरला! बसचालकाचा १७ वर्षीय मुलीवर अत्याचार, नांदेडला सोडतो म्हणाला अन्…

नागपूर : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानक परिसरात एका प्रवासी तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आरोपी पीडित मुलीचा विश्वास संपादन करत तिला बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घेऊन जात अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना आता नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीने एका रात्रीत तीन शहरं फिरवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा राज्य हादरले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप कदम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो नागपूर बसडेपोत चालक म्हणून काम करतो.
मिळालेल्या माहिती नुसार, पडीत १७ वर्षीय तरुणी ही आरोपीच्या ओळखीची होती, असं समोर आलं आहे. घटना घडली त्या दिवशी (ता.२२) पीडित मुलगी उमरखेड बस स्थानक परिसरात बसची वाट पाहत होती.
यावेळी आरोपी चालक त्याठिकाणी आला. त्याने पीडितेला कुठे जायचंय, असं विचारलं. यावर तिने नांदेडला जायचं असल्याचे सांगितले. यानंतर आरोपी संदीपने तिला मी तुला नांदेडला सोडतो,असे सांगितले आणि तो तिला घेऊन नांदेडला गेला.
रविवारी पहाटे ते तिला नांदेडहून नागपुरला घेऊन आला. पहाटे पाच वाजता नागपूरला बस पोहोचली. यानंतर तो पीडितेला आपल्या खोलीवर घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर नागपूर-सोलापूर या बसने तिला उमरखेडला सोडून दिले.
दुसरीकडे, शनिवारी मुलगी अचानक गायब झाली आणि रविवारी दिवसभर ती घरी न आल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता, पीडित मुलगी उमरखेड इथं आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बस स्थानकावरून अटक केली आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसटी प्रशासनाने आरोपीला नोकरीवरून निलंबित केले आहे.