Maharashtra Politics : शरद पवार गटाचे दोन महत्वाचे नेते अजित पवार यांच्या भेटीला, अधिवेशनानंतर पुन्हा वारं फिरणार?

Maharashtra Politics : एकीकडे नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारयांचे निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. शशिकांत शिंदे यांनी नागपुरातील उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘विजयगड’ येथे जाऊन दादांची भेट घेतल्याचा प्रकार ताजा असतानाच, अवघ्या दोनच दिवसात शरद पवार गटाचे आणखी दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. Maharashtra Politics
दरम्यान, दिवंगत नेते आर आर आबा यांचे सुपुत्र आणि पवार गटाचे युवा आमदार रोहित आरआर पाटील, तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली. योगायोगाने रोहित आणि सलील हे दोघेही माजी गृहमंत्र्यांचे लेक आहेत.
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अजित पवार शहरात आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारासच या भेटीगाठी घडल्या. रोहित पाटील आणि सलील देशमुख वेगवेगळे गेले असले, तरी ही भेट एकत्रित झाली का, हे समजू शकलेले नाही. मात्र पवार गटाचे नेते एकामागून एक अजित पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.