महापारेषणची टॉवर लाईनची वीजवाहिनी तुटली ! पुणे जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
पुणे: महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट २२० केव्ही व हिंजवडी २२० केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या २० वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजता बंद पडला. परिणामी भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी तालुक्यातील परिसरातील ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. दुपारी चार वाजेपर्यंत दुरुस्ती काम पूर्ण होईल व त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती महापारेषणकडून देण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव २२० केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेले महावितरणच्या सुमारे २० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागासह ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
महापारेषणची अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने ७० मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली आहे. मात्र तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत आहे. त्यात ७० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण होईल व साधारणतः ५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने मुळशी तालुक्यातील ४५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.