गोड बोलून जाळ्यात ओढलं; ठाण्यात 20 महिलांना करायला लावलं नको ते काम, मोठं कांड उघड, 9 जणांना बेड्या

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी 9 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. या टोळीने गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढल्याचा आरोप आहे. आतापर्यंत सुमारे 20 महिलांना या जाळ्यात अडकवल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी 21 फेब्रुवारी रोजी कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत सर्व 9 आरोपींना अटक केली होती.

सध्या हे सर्व आरोपी कल्याण जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप आणि संघटित पद्धतीने केलेली कारवाई लक्षात घेऊन पोलिसांनी मकोका लावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.
न्यायालयाची मंजुरी मिळाल्यानंतर 30 जून रोजी पोलिसांनी कारागृहात असलेल्या सर्व आरोपींना मकोका कायद्यानुसार पुन्हा अटक केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.