Loni Kalbhor : थेऊर येथे तलाठ्याकडून वर्षभर वीज चोरी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल..
Loni Kalbhor : एका तलाठ्याने मागील एक वर्षापासून थेऊर (ता. हवेली) येथील राहत्या घरी, सुमारे एक लाखाची वीजचोरी केल्याची माहिती महावितरणाच्या भरारी पथकाने छापा टाकून उघड केली आहे.
राज्यात महसूल विभाग लाचखोरीत पहिल्या स्थानावर असल्याची माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. आता याच खात्यातील एका तलाठ्याने ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईरान्ना नंदाप्पा उनदे व त्यांची पत्नी महादेवी ईरान्ना उनदे (दोघेही रा. स्वप्रशिल्प बंगला, बुटी पार्क, दत्तनगर, थेऊर, तालुका-हवेली)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल बाळकृष्ण कोष्टी (वय. ४८) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, विशाल कोष्टी हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उप. कार्यकारी अभियंता आहेत. ते सध्या मुळशी भरारी पथकात कार्यरत असून, वीज ग्राहकांच्या विद्युत संचांची तपासणी करणे व वीज चोरी आढळून आल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कार्यवाही करणे, असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे.
महावितरणाचे भरारी पथक थेऊर परिसरात १६ एप्रिल रोजी विद्युत संचांची तपासणी करीत होते. तेव्हा पथकातील वरिष्ठ वीजतंत्रज्ञ शुकलाल जाधव यांना घरगुती वीज ग्राहक ईरान्ना उनदे यांनी विद्युत पोलवरून डायरेक्ट वीजचोरी केल्याचे आढळून आले.
उनदे दांम्पत्याने मागील १२ महिन्यात महावितरणाची ८७ हजार ८८० रुपयांची वीजचोरी केली आहे. तडजोड रक्कम १२ हजार रुपये रक्कम भरलेली नाही. वीजचोरी करून महावितरणाचे सुमारे १ लाखाचे नुकसान केले आहे. Loni Kalbhor
दरम्यान, या प्रकरणी विशाल कोष्टी यांनी तलाठी ईरान्ना उनदे व त्यांची पत्नी महादेवी उनदे यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाम्पत्यावर भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुमार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव चव्हाण करीत आहेत.