माळेगावचा छत्रपती होऊ देणार नाही!! त्यासाठी मैदानात उतरणार, युगेंद्र पवार यांनी पुन्हा एकदा फुंकले अजितदादांविरोधात रणशिंग…

बारामती : गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली. आता पुन्हा एकदा अशी लढत होण्याची शक्यता आहे. येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तालुक्यातील वातावरण तापू लागले होते. परंतु माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली.
काही दिवसांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गट व सभासदांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाबाबत माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी सर्वात जास्त दर माळेगाव कारखान्याने दिला तरी शरद पवार गटाने आंदोलन केलं, अशी टीका केली होती. या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार यांनी पुन्हा एकदा केशव जगताप यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, शरद पवार गटाकडून आंदोलन झाल आहे असं मी म्हणणार नाही. कारण जे स्थानिक सभासद आहेत. ते कुठल्याही पक्षाचे नव्हते. आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा दिला किंवा पवार साहेब नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असतात. कारखान्यावर शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. त्याच्यामुळे आपले कर्तव्य आहे की कार्यकर्त्यांची इच्छा असेल ठामपणे, तर आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे.
माळेगाव हा कारखाना सोमेश्वर हा कारखाना किंवा उसाच्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचे खूप मोठे योगदान आहे. आज नाही तर चाळीस- पन्नास वर्षापासून जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत. आपल्याकडे चांगले सक्षम उमेदवार मिळत असतील आणि जर आपण हा कारखाना वाचवू शकलो, छत्रपती कारखाना होण्यापासून जर थांबवू शकलो, तर मग काय अडचण आहे? असंही युगेंद्र पवार म्हणाले.
यामुळे युगेंद्र पवार यांनी याबाबत संकेत दिले आहेत. माळेगावच्या कार्यक्षेत्रात परिस्थिती वेगळी आहे. नीरा नदी एवढी दुषित करून ठेवली आहे. उसाला त्यांनी आत्ता दर दिलेला नाही आणि एकदा कधीतरी दर दिला, म्हणून दरवर्षी तेच तेच सांगत बसायचं आम्ही दर दिला दर दिला. हे असं नसतं ना! असेही युगेंद्र पवार यांनी सांगितले आहे.
तसेच पंधरा वर्षांपूर्वी सर्वात जास्त दर छत्रपती कारखाना सुद्धा देत होता. आज काय अवस्था झाली आहे छत्रपती कारखान्याची? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित करून अजित पवारांवर थेट निशाणा साधला आहे. यामुळे सभासदांचे याकडे लक्ष लागले आहे.