बिबट्याने अकरा महिन्याच्या मुलाला आई समोरून उचलून नेलं, दौंड येथील राहू परिसरातील धक्कादायक घटना…

दौंड : येथील राहू दहिटणे बापूजी बुवा वस्ती परिसरातील भिसे यांच्या वाड्यावरून एका अकरा महिने वयाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेले. यामुळे मोठी खळबळ उडाली. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. या मुलाला आईच्या समोरुन बिबट्याने ओढून नेले असून आईने आरडाओरडा करेपर्यंत बिबट्या पळून गेला. या बिबट्याने अनेकदा पाळीव प्राण्यावरही हल्ले केलेले आहेत.
याठिकाणी वन विभाग व यवत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अद्यापही संबंधित चिमुकल्याचा ठाव ठिकाणा लागला नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
यावेळी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाला सातत्याने पाठपुरावा करुनही वनविभाग सुस्त असल्यानेच हा प्रकार घडला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परीसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी अनेकदा करुनही वनविभागाने हलगर्जीपणा केला असल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे.
अन्वनित भिसे असे या मुलाचे नाव असून या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ मोठे आक्रमक झालेले आहेत. दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे याठिकाणी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.