पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ!! ‘या’ भागात बिबट्या आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे जिल्ह्याच्या बिबट्याच्या वाढलेल्या संचारामुळे एकच खळबळ उडाली आहे. किन्हे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वाढलेल्या संचारामुळे ग्रामस्थांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याने गावातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्याने ही दहशत आणखी वाढली आहे. याचा थेट परिणाम गावातील शेतीविषयक कामांवर झाला असून, मजूर भीतीने शेतात कामावर येण्यास तयार नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
किन्हे गावात बिबट्याचा वावर वाढला आहे. दोन दिवसांपूर्वीच, म्हणजेच १० एप्रिल रोजी, पहाटेच्या सुमारास गावातील एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवून त्यास जखमी केले होते; ग्रामस्थांनी वेळीच आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला.
त्यानंतर, बुधवारी सकाळी अंदाजे ११ वाजण्याच्या सुमारास, गावातील एक शेतकरी, गुलाब विठ्ठल, यांच्या शेतामध्ये बांधलेल्या वासरांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. हा हल्ला शेजारील दुसरे शेतकरी दत्ता पिंगळे यांनी प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या वासरांना सोडून पळून गेला.
गुरुवारी सकाळी ज्या ठिकाणी वासरांवर हल्ला झाला होता, त्या परिसरात बिबट्याच्या पायाचे मोठे ठसे आढळून आले आहेत. तसेच, जवळच असलेल्या उसाच्या शेतामध्ये बिबट्या आरामात बसलेला किंवा विश्रांती घेत असल्याचे काही ग्रामस्थांनी सकाळी पाहिले.
किन्हे गाव हे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे आणि नदीमध्ये सध्या मुबलक पाणी आहे. तसेच, नदीकाठच्या शेतांमध्ये ऊस, मका, बाजरी यांसारखी उंच वाढणारी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
दरम्यान, या पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते आणि पाण्याच्या तसेच भक्ष्याच्या शोधात तो मानवी वस्तीजवळ येत असावा, असा अंदाज आहे. जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे बिबटे आता अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याचे चित्र आहे.