कोयता गँगच्या म्होरक्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

पुणे : पोलिसांनी पुण्यातील कोयता गँगच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शहरात विविध भागांत कोम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले असून कोयता गँगविरोधात मोठी कारवाई केली जात आहे.

मागच्या काही दिवसापासून कोयता गॅंगने दहशद माजवली आहे. ही गॅंग गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत आहे. त्याचबरोबर लोकांवर वार करायला देखील घाबरत नाही. त्यामुळे या गॅंगने लोकांच्या मनात भीती निर्माण केली. या गॅंगला पकडण्यासाठी ठोस पाऊले देखल उचलली. या गॅंगमधील काही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
दरम्यान, आता गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्याच्या नऊ साथीदारांना देखील स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपींकडून कोयते, तलवार अशी अनेक धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केली आहे. आता या सर्वांविरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. याबाबत माहिती स्वारगेटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.