पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ ; चार ते पाच टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड, तीन जणांना अटक

पुणे : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेले पुणे आता गुन्हेगारीच्या घटनांमुळे चांगलचं चर्चेत आल आहे. अशातच आता शहरातील हडपसर साडे सतरा नळी येथे काही टवाळखोरांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार वाहनांची तोडफोड केली. तसेच एका स्वीट मार्टच्या दुकानात घुसून कोयत्यानं तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत अज्ञात तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि कार अशा चार वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर तेथील एका स्वीट स्मार्टच्या दुकानात लोखंडी हत्यारानं दुकानातील वस्तूंचं नुकसान केलं. तसेच रस्त्यावरील एका पाणीपुरीच्या दुकानाचं नुकसान करून घटनास्थळावरून पसार झाले गेले.
चार ते पाच जणांची टोळी हातात कोयता घेऊन आल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्हीद्वारे तोडफोड करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात असून हडपसर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
