Kolhapur News : कोल्हापुरात पुन्हा वातावरण तापणार? हिंदू समाजाच्या वतीने १९ जुलैला बंदचा इशारा…

Kolhapur News : विशाळगड हिंसाचार प्रकरणावरून कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण या हिंसाचारात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.
पण याला सकल हिंदू समाजानं विरोध दर्शवला असून १९ जुलै रोजी कोल्हापूर बंदची हाक देण्याचा इशारा दिला आहे. विशाळगड हिंसाचारप्रकरणी इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या मोर्चाला सकल हिंदू समाजानं कडाडून विरोध दर्शवला आहे.
इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू तसंच या घटनेविरोधात एमआयएमने कोल्हापुरात मोर्चा काढल्यास १९ जुलैला सकल हिंदू समाजाच्यावतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत त्यांनी आपल्या समर्थकांना चलो विशाळगडचा नारा दिला होता.
पण संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच तेथील परिसरात हिंसाचार झाला. तेथिल घरे आणि दुकानांची जाळपोळ झाली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला होता.