मोठी बातमी! भाजपमध्ये गेलेले AAP चे खासदार अपात्र होणार का?; नियमांवरून सस्पेन्स

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खासदार राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी 24 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत पक्ष सोडत असल्याची घोषणा केली. त्यांच्या सोबत हरभजन सिंग, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल आणि राजेंद्र गुप्ता यांनीही आपला राजीनामा देत भाजपचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे.
या घडामोडीनंतर राज्यसभेत आम आदमी पक्षाच्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्याची माहिती देण्यात आली. संबंधित खासदारांनी भाजप नेतृत्वाची भेट घेत औपचारिक प्रवेशही केला आहे.

दरम्यान, या विलीनीकरण प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यसभेतील आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत पूर्ण झाल्याने दहाव्या अनुसूचीनुसार खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण होत नाही. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनीही विलीनीकरणाशी संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे.

यामुळे संसदेत भाजपची ताकद वाढणार असून आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.