कोविड रुग्णाला मारून टाक, ऑक्सिजन जास्त लागतोय!! डॉक्टरची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल…

मुंबई : सध्या वैद्यकीय क्षेत्राची मान शरमेनं खाली जाईल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा जीवतोड प्रयत्न करत होती. असे असताना सर्वांना हादरवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. कोविड रुग्णाला मारून टाक’ अशी एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर कार्यरत केली होती. याच काळातील एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. यात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संभाषण समोर आलं आहे. कोरोनात रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं होतं.
यामध्ये उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे आणि कोविड सेंटरवर नियुक्त डॉ. शशिकांत डांगे यांच्यात फोनवर भाषण समोर आलं आहे. यामध्ये डॉ. देशपांडे कोव्हिडच्या रुग्णाला चक्क मारून टाकण्याची भाषा करत आहेत.
दरम्यान, रुग्णाला वाचवणे हे डॉक्टरचे कर्तव्य असते. मात्र अशा स्वरूपाची चिथावणी वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात येणं, ही बाब केवळ धक्कादायक नाही, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.