मोठी बातमी! प्रौढ व्यक्ती बेपत्ता होताच अपहरणाचा गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचे पोलिसांना सक्त निर्देश


मुंबई : यापूर्वी १८ वर्षांखालील मुले बेपत्ता झाल्यास पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र, आता १८ वर्षांवरील प्रौढ व्यक्ती बेपत्ता झाल्यासही अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांचा कसून शोध घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांची तत्काळ अंमलबजावणी करत नवी मुंबई पोलिसांनी अशा प्रकारचा पहिला गुन्हा दाखल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले. कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तातडीने गुन्हा दाखल करून तिचा शोध घेण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश यापूर्वी २२ मे २०२६ रोजी सर्व राज्यांना देण्यात आले होते.

या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत नवी मुंबईतील एन.आर.आय. सागरी पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी रात्री भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणातील तक्रारदाराचा मुलगा चीनच्या सीमावर्ती भागात कार्यरत आहे. त्याची २३ वर्षीय पत्नी पतीसोबत फोनवर झालेल्या वादानंतर घरातून निघून गेली. पती सीमावर्ती भागात कार्यरत असल्याने तिच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांना चिंता निर्माण झाली.

त्यानंतर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्देशानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बेपत्ता प्रौढ व्यक्तींच्या प्रकरणातही आता पोलिसांकडून तातडीने गुन्हा दाखल करून शोधमोहीम राबवली जाणार असल्याने या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!