‘काशीबाई’चा बाजीराव अटकेत! अल्पवयीन अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर रोहित चंडेलवर पॉक्सोची कारवाई


मुंबई : लोकप्रिय हिंदी दूरचित्रवाणी अभिनेता रोहित चंडेल याला १६ वर्षीय अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, वारंवार फोन करून त्रास देणे, शिवीगाळ व मारहाण करणे अशा गंभीर आरोपांखाली त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या तक्रारदार मुलीची आणि रोहितची पूर्वीपासून ओळख होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून तिला संपर्क करत होता. तिने प्रतिसाद देणे बंद केल्यानंतर त्याने तिचा पाठलाग सुरू केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

५ जुलै रोजी मुलीच्या घराजवळ दोघांमध्ये वाद झाला. या वेळी आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रार दाखल होताच घाटकोपर पोलिसांनी तपास सुरू करून दहिसर येथील राहत्या घरातून रोहित चंडेलला अटक केली.

त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याबरोबरच भारतीय न्याय संहितेतील पाठलाग करणे आणि दुखापत पोहोचविण्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष पॉक्सो न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

रोहित चंडेलने ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ मालिकेत बाजीराव तर ‘पांड्या स्टोअर’मध्ये धवल मकवाना या भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती. या प्रकरणी अभिनेता किंवा त्याच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच आरोपांचे संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!