कसबा चिंचवड निवडणुकीत मनसेची भाजपाला साथ….!
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली असून चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी मनसेची हीच भूमिका राहणार आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्या घेऊन मनसे भाजपला निवडणुकीत साथ देणार आहे. दरम्यान महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार असली तरी मनसेचे कार्यकर्ते अथवा पदाधिकारी हे प्रचारात सहभागी होणार नाहीत. भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे, प्रदेश नेते बाबू वागस्कर आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली होती, पण त्याला प्रतिसाद न देता महाविकास आघाडी निवडणूकीत उतरली आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी मनसेने आपली भूमिका जाहिर करत भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता हा मनसेचा पाठिंबा युतीसाठी पुलाचे काम करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपाकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभेसाठी प्रयत्न केले जात होते. पण मनसे थेट प्रचारात सहभागी होणार नसल्यामुळे राज ठाकरेंच्या सभेची शक्यता धुसर झाली आहे.
याचदरम्यान मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत मनसेला इतिहासाची आठवण करुन दिली आहे. ते म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे. पण यामुळे पोट निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे.