Junnar News : जुन्नरहून तुळजाभवानीच्या पलंगाचे तुळजापूरकडे प्रस्थान..
Junnar News जुन्नर : श्रीतुळजाभवानी माता पलंगाचे जुन्नर येथील १० दिवसांच्या वास्तव्यानंतर शनिवारी (ता. ३०) जुन्नरहून नगरमार्गे तुळजापूरकडे वाजतगाजत मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे हा भवानीमाता पलंग तयार होऊन त्याचे भाद्रपद षष्ठीला जुन्नर येथे आगमन होते. Junnar News
शुक्रवार (ता.२२) रोजी सायंकाळी श्री तुळजा भवानी मातेची पलंगावर विधिवत स्थापना करण्यात आली. पलंगाचे जुन्नर येथे नऊ दिवस वास्तव्य होते. या काळात विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन समाज बांधवांकडून करण्यात येते. शनिवारी सकाळी पलंगाची मिरवणूक कल्याण पेठ, रविवार पेठ, तेली बुधवार, मंगळवार पेठ, पणसुंबा पेठ, सुसरबाग मार्गे काढण्यात येऊन कुमशेत गावाकडे पलंगाचे प्रस्थान झाले. पलंगाच्या आगमनावेळी या पेठेतील नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढून भंडारा-खोबर्याची उधळण करीत पलंगाचे स्वागत केले.
तसेच ऋषीपंचमी ते दसरा या कालावधीत हा पलंग जुन्नर, नगर ते तुळजापूरपर्यंत पायी प्रवास करीत मार्गक्रमण करतो. हा पलंग नेण्याचा मान नगरच्या पलंगे घराण्याकडे आहे. तुळजापूर मंदिरातील गाभार्यात दसरा ते कोजागिरी पौर्णिमा या पाच दिवसांत तुळजाभवानीदेवीची श्रमनिद्रा हा धार्मिक विधी पार पडतो.
दरम्यान, घोडेगाव येथून पलंगाचे आगमन जुन्नर येथे झाल्यानंतर शहरातून पलंगाची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर धार्मिक परंपरानुसार श्रीतुळजाभवानी देवीची पलंगावर विधिवत स्थापना केली जाते.
या पलंगाचा मुक्काम १० दिवस फक्त जुन्नरमध्येच तिळवण तेली समाज सभागृहात असतो. या १० दिवसांचे सर्व नियोजन जुन्नर येथील तिळवण तेली समाज बांधवांच्या वतीने करण्यात येते.