“भाजपमध्ये ये नाहीतर अमेरिकेतही संपवू…” कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीतला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीतच देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकारामुळे ऑनलाईन विश्वासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या समूहाचा वाढता डिजिटल प्रभाव आणि त्यातून निर्माण झालेले वैचारिक मतभेद या धमकीमागे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून (पूर्वीचे ट्विटर – X) या धमकीच्या प्रकाराबाबत जाहीरपणे माहिती दिली आहे. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी आणि पोलिसांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा व कडक कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टद्वारे केली आहे

अभिजित दीपके यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार , त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून कथित धमकीचे मेसेज आले आहेत. या चॅट स्क्रीनशॉटमध्ये, “तुला पैसे मिळतील, तुझे हे अकाउंट बंद कर, नाहीतर भाजपमध्ये ये. जर ऐकले नाहीस, तर अमेरिकेतही तुला मारून टाकले जाईल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

“मला नुकतीच जीवे मारण्याची धमकी आली आहे,” अशा कॅप्शनसह दीपके यांनी हा खळबळजनक चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टनंतर त्यांच्या सुरक्षेबाबत नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे..
दरम्यान, धमकीची ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेक युजर्सनी “आम्ही तुझ्यासोबत आहोत, घाबरू नकोस,” असा धीर दिला आहे. तर काहींनी या संपूर्ण प्रकरणामागे नक्की कोणाचा हात असू शकतो, याबाबत संशय व्यक्त केला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींचा शोध घ्यावा आणि दीपके यांना त्वरित सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही अनेक नेटकऱ्यांनी केली आहे.