बारामतीत ‘जयदादांची क्रेझ वाढली! जनता दरबारात नागरिकांची गर्दी, थेट संवादातून प्रश्नांना दिलासा

बारामती : “अजितदादांनंतर आता बारामतीला हक्काचं युवा नेतृत्व मिळालं,” अशी चर्चा गुरुवारी बारामतीत रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या जनता दरबाराला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता बारामतीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची छाप स्पष्टपणे दिसून आली.

राष्ट्रवादी भवन येथे सकाळी अकरापासून सुरू झालेल्या जनता दरबारात शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध समस्या मांडल्या. पाणीपुरवठा, रस्ते, महसूल, आरोग्य, शासकीय कामातील अडथळे अशा अनेक विषयांवर नागरिकांनी थेट संवाद साधला. प्रत्येक व्यक्तीची अडचण संयमाने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधत कार्यवाही करण्याच्या सूचना जय पवार यांनी दिल्या.
जनता दरबारात आलेल्या अनेक नागरिकांनी “अजितदादांसारखीच लोकांशी जवळीक आणि प्रश्न सोडवण्याची तत्परता जयदादांमध्ये दिसते,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यामुळे युवक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतरचा हा दुसरा जनता दरबार असून, दर गुरुवारी नागरिकांसाठी वेळ देणार असल्याचे जय पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील जबाबदाऱ्यांमुळेही पवार कुटुंब चर्चेत आले आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या यादीत पार्थ पवार यांना राष्ट्रीय महासचिवपद, तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिवपद देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पक्षाच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्षपद आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची जबाबदारीही जय पवार यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे पक्षातील महत्त्वाची सूत्रे पवार कुटुंबाकडे अधिक मजबूतपणे गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, कार्यकारिणी यादीत तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी दिले असले तरी अद्याप सुधारित यादी जाहीर न झाल्याने राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे.