मुंबईकडे निघाले जरांगे, पण पोलिसांचा ‘नो एंट्री’चा इशारा; गणेशोत्सवात वेशीवरच रोखणार?


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेलं उपोषण सोडून मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईची वाट धरली आहे. गेल्या १७ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांनी सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईच्या वेशीवरच जरांगे पाटील यांना पोलिसांकडून रोखले जाण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई आणि पुण्यासह राज्यभर गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि गर्दी पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी पोलिसांची भूमिका आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला दोन वेळा परवानगी नाकारली आहे.

मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने आंदोलन करण्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या निर्देशांनुसार आंदोलनासाठी आझाद मैदानासह निश्चित ठिकाणे आणि काही अटी-शर्ती लागू आहेत. त्यामुळे परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आंदोलकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा नेला किंवा वेगळ्या मार्गाने अचानक आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला, तरी पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या मुंबई प्रवेशाच्या मार्गावर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला जाऊ शकतो.

दरम्यान, सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, काही मागण्यांच्या अंमलबजावणीमध्ये कायदेशीर आणि संविधानिक अडचणी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या बाबींवर तोडगा काढण्यासाठी सरकारने वेळ मागितला आहे. दुसरीकडे, मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याची ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होताना जरांगे पाटील भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. गाडीत बसताच त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. यावेळी त्यांनी समाजाच्या लेकरांसाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सरकारसमोर शरण जाणार नसून मराठा आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी होईपर्यंत माघार घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकीकडे गणेशोत्सवामुळे मुंबईत वाढलेली गर्दी, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांचा मुंबईकडे सुरू झालेला प्रवास, यामुळे पुढील काही तासांत परिस्थिती काय वळण घेते याकडे लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!