महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार? फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चेवर केला मोठा खुलासा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. तसेच फडणवीस केंद्रात गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती.

या सर्व चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी केंद्रातील मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य करत या चर्चांना अप्रत्यक्षपणे फेटाळून लावले. “मी परवाच दिल्लीला गेलो होतो,” असे म्हणत त्यांनी या चर्चांवर मिश्कील प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वीच्या कर्जमाफीमध्ये काही कर्जदारांना लाभ मिळाला नव्हता. मात्र, यावेळी महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून लाभ मिळालेल्या आणि नंतर डिफॉल्टर झालेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे,” असा दावा फडणवीस यांनी केला. शरद पवार यांनी कर्जमाफीचे स्वागत केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

विदर्भातील पावसाच्या परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी धूळ पेरणीवर अवलंबून न राहता उशिरा पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गरजेनुसार विहिरी आणि सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
बोगस बियाण्यांवर कारवाईबाबत फडणवीस म्हणाले की, सोयाबीनच्या कमी दर्जाच्या बियाण्यांप्रकरणी कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत ५ हजार नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी ३०० नमुने निकृष्ट आढळले असून संबंधितांवर परवाना रद्द करण्यापासून फौजदारी कारवाईपर्यंतची पावले उचलली जातील.
मोशी परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणावर बोलताना त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. सध्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याला प्राधान्य दिले जात असून, त्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.