शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीवरील 2 लाखांची मर्यादा हटली; लाखो शेतकऱ्यांना मिळणार वाढीव लाभ


मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या सुधारित योजनेची घोषणा करत कर्जमाफीवरील यापूर्वीची 2 लाख रुपयांची कमाल मर्यादा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे मर्यादा ओलांडल्याने किंवा तांत्रिक कारणांमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.

सरकारने योजनेची व्याप्तीही वाढवली असून, यापूर्वी 2025-26 पर्यंतच्या थकीत कर्जांचा विचार केला जात होता. आता 2026-27 या आर्थिक वर्षातील थकीत कृषी कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा असून, सरकारकडून तब्बल 36 हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 20 हजार कोटी, दुसऱ्या टप्प्यात 22 हजार कोटी आणि त्यानंतर 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा सरकारचा मानस आहे.

2019 मधील महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा एक रुपयानेही जास्त थकबाकी असल्यास लाभ नाकारला जात होता. मात्र नव्या धोरणानुसार अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच यापूर्वी लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही नव्या नियमांनुसार वाढीव कर्जमाफीचा फायदा मिळू शकतो.

दरम्यान, 50 हजार रुपयांच्या नियमित परतफेड प्रोत्साहनाची अट रद्द करण्याची मागणी सरकारने नाकारली. अशी अट हटवल्यास राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा भार पडेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. बँकिंग शिस्त अबाधित ठेवत गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याचा समतोल सरकारने साधल्याचा दावा त्यांनी केला.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बँकेचे पासबुक, आधार कार्ड (मोबाईल व बँक खात्याशी लिंक), अद्ययावत 7/12 व 8-अ उतारा तसेच कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र किंवा थकबाकी पत्रक आवश्यक राहणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पुन्हा बँकिंग व्यवस्थेत आणण्यास आणि खासगी सावकारांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!