मफलरच्या धाग्यात दडलंय मोठं गुपित? रोहित पवारांचा दावा; १० ऑक्टोबरला ‘त्या’ नेत्याचं नाव आणि पुरावे उघड करणार

मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताला आठ महिने उलटले, तरी या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबलेले नाहीत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी १० ऑक्टोबरला मोठा खुलासा करण्याची घोषणा केली आहे. व्हीएसआर कंपनी आणि या कंपनीशी संबंधित व्यक्तीला एका बड्या राजकीय नेत्याकडून वाचवले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या नेत्याचे नाव पुराव्यांसह जाहीर करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘मफलर’ हा केवळ एक धागा असून त्यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा चेहरा आहे. एका कार्यक्रमात विशिष्ट रचनेचा मफलर घातलेल्या या नेत्याचे नाव आणि छायाचित्र १० ऑक्टोबरला दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच छगन भुजबळ आणि अरविंद केजरीवाल यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. व्हीएसआर कंपनीचे व्यवहार, कंपनीला कोण मदत करत आहे आणि कोणत्या पद्धतीने संरक्षण दिले जात असल्याचा त्यांचा दावा आहे, याची माहिती पुराव्यांसह मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात त्यांच्यासह अन्य चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या चौकशीबाबत रोहित पवार यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी यापूर्वीही व्हीएसआर कंपनी, विमानाची स्थिती आणि चौकशीतील विलंबाबाबत आरोप केले होते.


दरम्यान, अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात खराब दृश्यमानता, बारामती विमानतळावरील काही पायाभूत सुविधांशी संबंधित बाबी आणि वैमानिकाच्या कार्यवाहीविषयक निर्णयांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे रोहित पवार आता मांडणार असलेल्या दाव्यांमधून या अपघाताच्या प्रकरणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वाजता मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. हे सादरीकरण पूर्णपणे तांत्रिक नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कंपनी, तिचे व्यवहार आणि तिला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींशी संबंधित मुद्दे मांडले जातील. एएआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्यातील तांत्रिक बाबींवर स्वतंत्रपणे भाष्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत नेमके कोणते पुरावे समोर येतात आणि रोहित पवार कोणत्या नेत्याचे नाव घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.