रिलेशनशिपमध्ये हस्तक्षेप महागात पडला! मुलीच्या प्रियकराकडून आईच्या बॉयफ्रेंडची हत्या, पुण्यात खळबळ…

पुणे : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून हडपसर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या प्रियकरानेच तिच्या आईच्या प्रियकराचा खून केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना हडपसरमधील काळेपडल परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत गणेश संजू बिरादार (वय २५) याचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्या महिलेच्या मुलीचे आरोपी दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय २१) याच्याशी संबंध होते.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे गणेशने संबंधित मुलीला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. याच कारणावरून काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. हा राग मनात धरून आरोपीने कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश ससाणेनगर परिसरात थांबला असताना आरोपी दुर्वांग आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.

दरम्यान, त्यानंतर आरोपींनी गणेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला आणि घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.