राज्यात पावसाचा धडाका; अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा


मुंबई : राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच मुंबईसह अनेक भागांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळू शकतात.

मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांत २४ तासांत २०० मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता असून पुढील ७२ तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरातही चांगला पाऊस अपेक्षित असल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून आजही रेड अलर्ट कायम आहे. परिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून धामणे आणि कवडास धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. जव्हार आणि मोखाडा परिसरातील पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून भात लागवडीला गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्टनुसार सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते, मात्र निचरा लवकर झाल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झाला नाही. पूर्व द्रुतगती मार्ग, घोडबंदर रोड तसेच कल्याण आणि नाशिककडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

रायगड जिल्ह्यासाठी २ ते ४ जुलैदरम्यान अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नद्या-नाले तुडुंब भरण्याची, सखल भागांमध्ये पाणी साचण्याची तसेच घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी पुढील आदेशापर्यंत समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २ जुलै रोजी यलो अलर्ट, तर ३ ते ५ जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह कोकण-गोवा किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किमी, तर काही ठिकाणी ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बंदरांवर इशारा क्रमांक ३ चा धोक्याचा बावटा फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, नागपूर शहरात रात्री झालेल्या दमदार पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रखडलेली भात लागवड आणि पेरणीच्या कामांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!