राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर! सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून घमासान; नोटीस देणाऱ्यामागे नेमका कोण?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पक्षातील राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवत त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड पक्षाच्या घटनेनुसार नसल्याचा आक्षेप घेतला आहे.

या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून ही नोटीस पाठवली आहे की, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जाणार असल्याची भूमिका पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आली आहे. आता या प्रकरणात पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत प्रफुल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत संघर्ष असल्याची चर्चा रंगली होती. आता अध्यक्षपदाच्या निवडीवर उपस्थित करण्यात आलेला आक्षेप हा त्याच वादाची पुढची कडी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल पटेल यांनी केलेल्या पत्रव्यवहारावरूनही पक्षात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यात सुनेत्रा पवार यांनी पत्र पाठवून काही बाबींमध्ये बदल केला होता. यावेळी प्रफुल पटेल यांचा उल्लेख केवळ राज्यसभेचे गटनेते म्हणून, तर सुनील तटकरे यांचा उल्लेख लोकसभेचे गटनेते म्हणून करण्यात आला होता.

मात्र, या बदलांना चार महिने उलटूनही दोन्ही नेत्यांच्या पदांबाबत पक्षाकडून अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. तसेच निवडणूक आयोगाला याबाबत नव्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे का, याचीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर घेण्यात आलेल्या आक्षेपामागे पक्षातील कोणत्या वरिष्ठ नेत्याचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कोणताही संबंध नाही. त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेनुसारच झाली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढण्यासाठी काही संघटनात्मक सुधारणा आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. “हे मत मी नोटीस येण्यापूर्वी अनौपचारिक चर्चेत मांडले होते. माझ्या मताचा आणि नोटीसचा कोणताही संबंध नाही,” असेही प्रफुल पटेल म्हणाले.
कोण आहेत सच्चिदानंद सिंह?
सच्चिदानंद सिंह हे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
ते गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलेले आहेत.
अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना डिसेंबर 2023 मध्ये कर्जत येथे त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
26 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
सच्चिदानंद सिंह यांचे प्रमुख आक्षेप
28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या निधनानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाकडून निवडणूक आयोगाला सुधारित घटना सादर करण्यात आली होती. या घटनेनुसार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवड होईपर्यंत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याकडे अध्यक्षपदाचे अधिकार राहतील, असे नमूद करण्यात आले होते.
सुधारित घटनेनुसार प्रफुल पटेल यांच्याकडे सर्व अधिकार असताना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कोणत्या अधिकाराने बोलावण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावर तत्कालीन कार्यकारिणी सदस्यांची परवानगी घेण्यात आली होती का, यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेतृत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पक्षातील अंतर्गत राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.