2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणारच! लाल किल्ल्यावरून PM मोदींचा निर्धार; देशाच्या प्रगतीचा मांडला लेखाजोखा

नवी दिल्ली : देशभरात आज 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरही स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 13 व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित केले.
यंदाचा स्वातंत्र्यदिन ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष उत्साहात साजरा केला जात आहे. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज घराघरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे. मोठ्या उत्साहाने आणि नव्या संकल्पाने देश पुढे जात आहे.” देशाच्या विकासासाठी मोठी स्वप्नं आणि ठाम संकल्प आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.


2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार
2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. मोठे ध्येय समोर ठेवल्यास विचार आणि प्रयत्नांची दिशा बदलते, असेही त्यांनी सांगितले.
देशाच्या काही भागांत आलेल्या पूर आणि भूस्खलनाचा उल्लेख करत मोदी यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केली. “संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे,” असा विश्वास त्यांनी दिला.
भारताच्या प्रगतीची आकडेवारी मांडली
गेल्या काही वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत मोठी प्रगती केल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. संरक्षण उत्पादन, खादी आणि ग्रामोद्योग, इलेक्ट्रॉनिक उत्पादन, रेल्वे, मोबाइल निर्मिती आणि डिजिटल व्यवहारांमध्ये झालेल्या वाढीची आकडेवारी त्यांनी भाषणातून मांडली.
मोबाइल उत्पादनात मोठी वाढ झाली असून, डिजिटल व्यवहारांमध्येही भारताने मोठी झेप घेतली आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या आणि पेटंट मंजुरीतही वाढ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
“140 कोटी भारतीयांनी घेतलेला विकासाचा संकल्प आता रोखणे अवघड आहे,” असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.