माशांच्या सेवनात भारताचा जगात डंका! भारत तिसऱ्या स्थानी…


नवी दिल्ली : शाकाहार आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे अनेकांचे सांगणे असले तरी मांसाहारींची संख्याही देशात कमी नाही. मागील काही वर्षांत देशवासीयांचा मांसाहाराकडे वाढता कल दिसत असून, त्यातही माशांना अधिक पसंती मिळते आहे.

एका सर्वेक्षणानुसार, मासे खाणाऱ्या भारतीयांचे प्रमाण ६.१ टक्क्यांनी वाढून ते ६६ वरून ७२.१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळेच माशांच्या सेवनात भारत जगात तिस-या स्थानी आला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मासे खाण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. सन २०४७-४८ पर्यंत दरडोई मासे खाण्याचे प्रमाण ४१.२९ किलोपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

भारतीयांच्या आहारातील माशांच्या समावेशाबाबत राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. भारत हा तिसरा सर्वांत मोठा मत्स्यउत्पादक देश असून, जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे आठ टक्के योगदान देतो. दरडोई मत्स्य अन्न पुरवठ्याच्या बाबतीत, भारत १८३ देशांमध्ये १२९व्या स्थानी आहे. दरडोई मासळीचा वापर १५ वर्षांत ८.८९ किलोपर्यंत म्हणजे ८१.४३ टक्के वाढला आहे.

मासे खाणाऱ्या लोकसंख्येमध्ये, वार्षिक दरडोई वापर ६६ टक्क्यांवरून ७२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे वर्ल्ड फिश, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण आणि संशोधन संस्था (आयएफआरपी) व भारतीय कृषी संशोधन परिषद (सीएजीआर) यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. सन २००५-२१ या काळात देशातील मत्स्यउत्पादन दुपटीने वाढून १४.१६४ दशलक्ष टनावर पोहोचले. वार्षिक वाढ सरासरी ५.६३ टक्के नोंदविण्यात आली आहे.

कोण आहे आघाडीवर?

देशातील ७८.६ टक्के पुरुषांच्या, तर ६५.६ टक्के महिलांच्या आहारात माशांचा समावेश असतो. सहा टक्के लोक दररोज मासे खातात, तर ३४.८ टक्के लोक आठवड्यातून किमान एकदा तरी त्यांना प्राधान्य देतात. तसेच, ३१.३५ टक्के लोक काही कारणानिमित्त माशांचे सेवन करतात.

देशात त्रिपुरात (९९.३५ टक्के) सर्वाधिक मासे फस्त केले जातात, तर हरियाणात (२०.५५ टक्के) त्याचे प्रमाण सर्वांत कमी आहे. तामिळनाडू, केरळ, गोवा येथेही ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात माशांचे सेवन केले जाते. पंजाब, हरियाण व राजस्थानात ३० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात माशांना पसंती दिली जाते.

का मिळतेय सर्वाधिक पसंती?

मागील १५ वर्षांत देशवासीयांचे वाढलेले उत्पन्न, आरोग्याविषयी वाढलेली सजगता, उंचावलेले राहणीमान आणि वाढते शहरीकरण या कारणांमुळे देशात मासे खाणारे वाढले आहेत. जागतिक बँकेच्या मध्य उत्पन्न गटात भारताची कामगिरी सुधारल्याने त्याचाही आहारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. भारतातील गरिबीचे प्रमाण कमी झाल्याने दरडोई मासे खाण्याचे प्रमाण भरघोस वाढले आहे.

विशेष म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढीपेक्षा मासे खाणा-यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र, असे असूनही भारत आजही आहारातील माशांच्या समावेशात जागतिक सरासरीत पिछाडीवरच आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!