Indapur : इंदापूरच्या तहसीलदारांच्या मागे संपूर्ण तालुका, वाळू माफियांना शिकवा चांगला धडा….
Indapur : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची शासकीय गाडी फोडत त्यांच्यावर काल जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे हा प्रकार घडला आहे.
तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्याचा प्रमुखच जर सुरक्षित नसेल तर काय करायचे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. परंतु इंदापूरच्या पोलिसांनी अवघ्या काही वेळातच पाच जणांना पकडले. शिवाजी किसन एकाड, पिण्या उर्फ प्रदीप बागल, विकास नवनाथ देवकर, तेजस अनिल वीर व माऊली उर्फ शुभम भोसेकर आशिया पाच आरोपींची नावे आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये या गुन्ह्यामागील कारण सांगताना वाळूचा उल्लेख केला.
श्रीकांत पाटील हे काही इंदापूर तालुक्यात नवीन तहसीलदार नाहीत. यापूर्वी देखील त्यांनी या तालुक्याचा कारभार पाहिलेला आहे. सामान्यांच्या प्रश्नासाठी सामोपचाराने मार्ग काढणारा तहसीलदार आणि चुकीचं कृत्य करणाऱ्यांना वठणीवर आणणारा तहसीलदार अशी त्यांची तालुक्यात एक प्रतिमा तयार झाली आहे.
त्यांनी वाळूमफियांसंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका हेच या हल्ल्यामागचे प्रमुख कारण आहे. भरल्या नदीत उडी मारून वाळू माफियांची गठडी वळणारे तहसीलदार म्हणूनही श्रीकांत पाटलांची ओळख तयार झाली आणि तिथूनच त्यांची दहशत निर्माण झाली. पण झालं काय अचानक श्रीकांत पाटलांची बदली झाली, अन् मधल्या काळात एक काळूची मावशी वाळूसाठी एवढी तडफडत होती की, तिच्यामुळे पुन्हा वाळूमाफियांचा हैदोस वाढला.
महसूल खात्यात कसा अधिकारी नसावा याची जागोजागी प्रत्यंतर आले. वाळू माफियांच्या संरक्षणासाठी अगदी पोलीस कोठडीत जाऊन बसण्यापर्यंत एका महिला अधिकाऱ्याची मजल गेली आणि तिथेच इंदापूरच्या या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. या एका महिला अधिकाऱ्याच्या भयाण परिस्थितीमुळे पुन्हा एकदा वाळू माफियांचे फावले. त्यांनी पुन्हा गावत दहशत निर्माण केली. Indapur
पैशाच्या जोरावर काहीही पचते यावर विश्वास असलेल्या आणि बसलेल्या या वाळू माफियांनी पुन्हा तालुक्यात नंगानाच केला. आता पुन्हा एकदा तहसीलदार म्हणून श्रीकांत पाटील आले आहेत साहजिकच आपलं साम्राज्य खालसा होतंय. वाळूचा अफाट पैसा बंद झालाय, या चिंतेने या वाळू माफियांची झोप उडाली आहे. त्यांच्या मागे फिरणाऱ्या चमच्यांचं पोट कसं भरायचं आणि मग आपली दहशत अखंड कशी होणार? असा प्रश्न या वाळू माफियांना पडला नसेल तरच नवल.
श्रीकांत पाटील तालुक्यात सर्वांना हवे आहेत, पण अवैध धंदेवाल्यांना नकोत. आता हे अवैध धंदेवाले कोण? कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे फ्लेक्स मधून उगवत राजकीय नेत्यांचा उदो उदो करताना आपला धंदा शाबूत ठेवण्याची अपेक्षा करणारे हे वाळू मफिया
श्रीकांत पाटलांवर राग धरून आहेत. पण इतकाच प्रश्न महत्त्वाचा आहे, की इंदापूर तालुक्यातील वाळू माफिया कोणी पोसले? राजकारणासाठी अशा गावगुंडांचा वापर कोणी केला? गावातील गल्ली गल्लीत हिंडणारी पोरं आपल्या मागे फिरवीत यासाठी तयार झालेले ग्रुप कोणी पोसले?
या प्रश्नांची उत्तर हवी असतील, तर इंदापूर तालुक्याच राजकारण सखोल पहावं लागेल. इंदापूर तालुक्यात शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी का रमत नाहीत? शासकीय अधिकाऱ्यांना इंदापूरची बदली म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा का वाटते? इंदापूरचा प्रशासकीय इतिहास एवढ्या बदनाम का झाला आहे? याच्या खोलात कोणी जातच नाही. असा इतिहास असूनही श्रीकांत पाटील पाय रोवून उभे आहेत. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचे स्वभावाचे कमी अधिक गुणविशेष असतात.
ते प्रत्येकाचे समाधान करू शकत नाहीत हे नक्कीच. पण तरीदेखील प्रशासकीय इतिहासात बदलीवर आलेला अधिकारी दोन ते तीन वर्षात सोबत खोरे घेऊन येतो, अशा अधिकाऱ्याला कोणाला अंगावर घ्यावेसे वाटत नाही.
मग जे अधिकारी चुकीच्या प्रवृत्तीला अंगावर घेतात त्यांच्यावर दहशत माजवण्याचा असा प्रयत्न होतो ही पहिलीच वेळ आहे, म्हणूनच या दहशत वाजणाऱ्यांवर अशी दहशत बसवली पाहिजे कायदा आणि सुव्यवस्थेची; की पुन्हा यांचे धाडस होता कामा नये. आणि गुन्हेगारांनी हे लक्षात घ्यावं की, अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी अख्खा इंदापूर तालुका उभा आहे आणि तो उभा राहील.
बाकी, श्रीकांत पाटील यांनी त्यांचं काम करत राहावं. त्यासाठी इंदापूरकरांनी त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं. बऱ्याच वर्षाच्या कालखंडात एक अधिकारी कायद्याची बुज राखतो आहे याचं समाधान ठेवतानाच त्याच्या बऱ्या वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहणं सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे.