Indapur Accident : इंदापूरमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवला ट्रक..

Indapur Accident इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर शहर बाह्यवळणाच्या जवळ एका भरधाव ट्रकने एका दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रक संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिली. Indapur Accident

ही घटना ऐन दस-याच्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर गलांडवाडी नं १ गावच्या हद्दीत घडली. या प्रकरणी अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दशरथ मारुती चोरमले (वय.५० वर्षे, काळके वस्ती, गलांडवाडी नंबर १ ता.इंदापूर) यांचा मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे पुतणे रोहिदास बाळु चोरमले ( रा. काळखेवस्ती,गलांडवाडी नं.१) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, दशरथ मारुती चोरमले हे दूध विक्री करुन आपल्या हिरो होन्डा कंपनीच्या दुचाकीवरुन (क्र. एम आय १४२ सी ५६०४) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याने इंदापूरातून आपल्या गावी निघाले असताना गलांडवाडी नं.१ गावच्या हद्दीतील हॉटेल मातोश्रीच्या समोर दुचाकीच्या पाठीमागून भरधाव वेगाने पुण्याकडे चाललेल्या ट्रक (क्र.एमएच ३२ ए जे.९२७३) च्या चालकाने दुचाकीस ठोस दिली.
त्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात दशरथ चोरमले हे जागीच मरण पावले. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक तेथेच सोडून आरोपी पळून गेला.ही घटना सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी घडली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला.
दरम्यान पेटवलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न करताना इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे यांना किरकोळ भाजल्याची माहिती मिळत आहे. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचेसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या अग्निशामकच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.