पुण्यात लोकअदालतीचा वेळ वाढवा, नागरिकांचा संताप, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रशासनाकडे मागणी…

पुणे : पुण्यामध्ये 10 ते 13 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु यासाठी मर्यादित स्वरुपातच टोकन दिल्याने अनेकांना याचा लाभ घेता आला नाही. यामुळे नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला असून नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचे विडिओ देखील समोर आला आहे.

त्यामुळे या लोकअदालतीचा वेळ आणखी पाच दिवसांनी वाढवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. याबाबत बारामती लोकसभा मतदार संघाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. यामुळे प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी शासनाला विनंती आहे की, कृपया आपण नागरीकांचे म्हणणे लक्षात घेऊन लोकअदालत पाच दिवसांनी वाढवावी. तसेच या काळात जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटाचा व्हावा यासाठी टोकनसंख्या देखील वाढवावी.

यामुळे अनेकांना याचा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या माध्यमातून अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवले जातात. यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून प्रतिसाद देतात. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.