गजा मारणेच्या अडचणीत वाढ! IT इंजिनिअरला मारहाण करतेवेळी गजा मारणे, रुपेश मारणेसोबत २ फॉर्च्युनर अनेक दुचाकी असल्याचे झाले उघड…

पुणे : कोथरुडमधील भेलकेनगर येथे आय टी इंजिनिअर देवेंद्र जोग यांना मारहाण करतेवेळी गजानन मारणे याच्याबरोबर २ फॉर्च्युनर, एक कार आणि ७ ते ८ दुचाकी यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या गाड्यांचे नंबर मिळवून त्या जप्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी पुढील कारवाई सुरु आहे.शिवजंयतीच्या दिवशी देवेंद्र जोग हे दुचाकीवरुन जात असताना भेलके नगर येथे वाहनांची गर्दी झाली होती. त्यावेळी ते तेथून पुढे जाऊ लागताच दोघे जण त्यांच्याजवळ आले व त्यांना हळू जा, धक्का देतोस का असे म्हणून बेदम मारहाण केली होती.
याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सुरुवातील मारामारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही मारहाण करणारे कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतील सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याच्या चौघा साथीदारांसह गजा मारणे व रुपेश मारणे यांना आरोपी करण्यात येऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
त्यानंतर गजा मारणे हा स्वत: कोथरुड पोलीस ठाण्यात हजर झाला. मंगळवारी गजा मारणे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याने या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, गजा मारणे व त्याचे साथीदार हे सिटी प्राईड, कोथरुडला चित्रपट पाहून एकत्रितपणे शास्त्रीनगरला दुपारी साडेचार वाजता जात होते. यावेळी भेलकेनगर येथे गाड्यांचा हा ताफा थांबला होता. यावेळी जोग यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहेत. जोग यांना मारहाण होताना तेथे गजा मारणे याच्याशी संबंधित दोन फॉर्च्युन गाड्या आणि एक कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्या. याशिवाय आणखी ७ ते ८ दुचाकी वाहने त्यात दिसून येतात. या गाड्या जप्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.