प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण


मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे,ज्यामुळे शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र शेतक-यांनी नैसर्गिक शेतीवर भर देवून कमी खर्चात जास्त उत्पन्नावर आधारित पीक पध्दतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे काळाची गरज आहे.. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

राजस्थान बौसंवाडा येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, राज्यातील पी एम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आणि पी एम कुसुम सी बी – मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणाली द्वारे राज्यातील २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतक-यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढले आहे. आता शेतक-यांनी केमिकल मुक्त शेती करण्यासाठी भर दिला पाहिजे. झिरो कॉस्ट फार्मिंग ला देखील महत्त्व दिले पाहिजे. . झिरो बजेट नैसर्गिक शेती ही अशी शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाचते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेती ऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,भारताला आज रोजी एक लाख करोड खाद्यतेलाच्या आयात करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिलेटची देखील सध्या खूप मागणी आहे हे लक्षात घेता त्या प्रकारच्या पद्धतीची पिके घेतली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनाआर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल.राज्याचे राज्यपाल आर्चाय देवव्रत यांची नैसर्गिक शेतीवरील व्याख्यांनाचे शेतक-यांनी जरूर ऐकावे असे आवाहनही त्यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!