उन्हाळ्यात त्वचा ताजीतवानी ठेवण्यासाठी काय कराल उपाय !
उरुळी कांचन : कडक उन्हाळ्यातही आपण ताजेतवाने दिसावे असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. ऋतुमानानुसार काही बदल केले, सावधगिरी बाळगलीत तर नक्कीच तुमचं सौंदर्य वृद्धिंगत होऊ शकतं. इतर ऋतूंपेक्षाही उन्हाळ्याचा परिणाम त्वचेवर लवकर होतो.
कडक ऊन, उष्णता यामुळे त्वचा रूक्ष व निर्जीव होते. ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. जर ऋतुमानानुसार आवश्यक काळजी घेतली नाहीत तर आहे ते सौंदर्य नाहीसं होण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला उन्हाळ्यातही सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल आणि सुंदर दिसायचं असेल तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी काही महत्वाच्या टीप्स.
कोमल त्वचा :
उन्हाळ्यातील कडक ऊन आणि गरम हवा यामुळे त्वचेचं नुकसान होतं. यामुळे त्वचेचा चमकदारपणा नाहीसा होऊन त्वचा कोमेजते. त्वचा मऊ व कोमल बनण्यासाठी मिल्क पावडरमध्ये काकडीचा रस मिसळून लावा. थोड्या वेळाने चेहरा’ थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचा रंग ऊजळेल.
याशिवाय एक चमचा संत्र्याच्या रसात, एक चमचा गव्हाचे पीठ, थोडासा मध व गुलाब जल असे मिश्रण चेहऱ्याला १५-२० मिनिटं लावा. नंतर पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
कपडे
कपडे सोयीचे, सुटसुटीत असावेत, ज्यामध्ये वावरताना तुम्हाला मोकळेपणा वाटेल असेच कपडे घालावेत. शक्यतो कपडे सैल घालावेत. फिकट रंगाचे. सुती कपडे या दिवसात वापरणे उत्तम. त्वचेला हवा लागण्यासाठी स्लिव्हलेस, शॉर्टस वापरणे उत्तम.
उन्हात जाताना मात्र संपूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे निवडावेत. कारण उन्हाचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो.
केसांची काळजी घ्या
या दिवसात केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. केस कोरडे होऊ नयेत यासाठी कंडीशनरचा वापर जरूर करा. धूळ, ऊन आणि अतिनील किरणांपासून केसांचं रक्षण करण्यासाठी केस झाकूनच उन्हात जा. जर तुम्ही केस कलर केले असतील तर त्यांना अधिक संरक्षणाची गरज आहे.
मेकअप
लाइट मेकअपच करा. मेकअपच्या आधी बर्फाचा एक खडा कापडात गुंडाळा व चेहऱ्यावर फिरवा. फाऊंडेशनचा वापर करत असाल तर त्यात थोडं पाणी घालून मग वापरा.
बेबी पावडर व फाऊंडेशन लावून झाल्यानंतर गुलाब पाण्याचे काही थेंब टिश्यू पेपरवर घेऊन चेहरा हलकेच पुसा.
बोलके डोळे
डोळे आकर्षक आणि मोठे दिसावेत यासाठी ब्राऊन आयशॅडोची आऊटलाइन काढा. त्यानंतरच मस्करा लावा. यामुळे खूप गडद मेकअप न करताही तुमचे डोळे उठावदार दिसतील.
रात्रीच्या वेळेस तुम्हाला कुठे जायचं असेल तर फिकट गुलाबी रंगाने पापण्यांना हायलाइट करा.