हवेलीत राष्ट्रवादी ने ‘जे पेरले तेच उगविले’! बाजार समितीच्या निवडणूकीत भूमिका घेता येईना…!
उरुळी कांचन : जयदीप जाधव
हवेली बाजार समितीची तब्बल १९ वर्षानंतर लोकनियुक्त संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातल्याने या निवडणूकी निमित्ताने तालुक्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. या बाजार समितीची निवडणूक लढण्यासाठी राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने सर्वपक्षीय पॅनेल उभे करुन राष्ट्रवादी च्या गोटात बंडाळी माजविण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. भाजपच्या या भूमिकेत इच्छुकांनी मोठी साथ दिली असून या सर्वपक्षीय पॅनेलच्या हालचालींत इच्छुकांची मोठी रांग सर्वपक्षीय पॅनेल मागे उभे राहत असल्याचे चित्र आहे.मात्र या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी ची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रातील जिल्हा बँक असो की बाजार समिती यापूर्वी राष्ट्रवादी ने घेतलेल्या सोईच्या भूमिकेने राष्ट्रवादीलाच खिंडीत पकडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बाजार समितीच्या महत्वाचा निवडणूकीत ने ‘जे पेरले ते उगवले’ अशी काही आवस्था दिसून येत आहे.
हवेली तालुक्यात राष्ट्रवादी स्थापनेनंतर तालुक्यात राष्ट्रवादी ची एकसंध ताकद होती. पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी ची मोठी ताकद होती. हवेली तालुक्यात सर्व सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी च्या मंडळींचे वर्चस्व होते. जिल्हा बँक ,बाजार समिती व यशवंत कारखान्यावर राष्ट्रवादी अंतर्गत मंडळींच्या ताब्यात या संस्था होत्या. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना माननारा हा सर्व गट असल्याने तालुक्यातील सहकारातील नेतेमंडळींत या निवडणूका होत गेल्या आहेत. या सर्व मंडळींनी लोकसभा ,विधानसभा असो की राष्ट्रवादीला सढळ हाताने मदत करत गेली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका किंवा सहकारी संस्थांच्या निवडणूकीत हे मंडळींनी जो जिंकेल तो माझा ‘ या युक्तिने सर्वांवर ‘मायेचा’ हात ठेवला. मात्र वरिष्ठ नेते या मंडळींना जिल्हा बँक, कारखाना, बाजार समिती निवडणूक लढविताना सोईस्कर पणे डोळेझाक करीत आल्याने आता हीच मंडळी एकमेकांच्या विरोधात उठल्याने हीच भूमिका आता राष्ट्रवादी च्या नेत्यांच्या गळ्याशी येऊ ठेपली आहे.
कारण हवेली तालुका हा विधानसभेच्या आठ विधानसभा मतदारसंघात विखुरलेला तालुका आहे. अशातच जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणूका ह्या राष्ट्रवादी च्या समर्थकांत होत आल्या आहेत. अशातच पूर्वीचे बरखास्त संचालक मंडळातील संचालक हे आपलेच समर्थक आता दोन गटांत विभागले आहेत. अशी आवस्था राष्ट्रवादी ची आहे. अशातच ही संस्था अनेक वर्षे प्रशासकीय राजवटीत असताना,संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी च्या वरिष्ठ मंडळींनी तालुक्याच्या ताब्यात या संस्था न देता, या संस्था निवडणूकीपासून लांब कशा राहतील असे पध्दतशीर प्रयत्न झाल्याचे तालुक्यात ही मंडळी उघडपणे बोलू लागली आहे. अशीच आवस्था यशवंत कारखान्यात झाली असून ११ वर्षापूर्वी राष्ट्रवादी च्या सत्ताकाळात कारखाना बंद पडून कारखाना प्रश्नात आजतागायत वरिष्ठ नेत्यांनी मदत केली नसल्याचा आक्षेप घेऊन संस्था बंद ठेवली असा आरोपही मंडळी करीत आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीचीच मंडळी भाजपच्या नेतेमंडळींनी बाजार समिती तालुक्याच्या अस्तित्वात रहावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांचे उतराई व्हावे म्हणून सर्वपक्षीय पॅनेल माध्यमातून निवडणूक लढवावी म्हणून तयारी सुरू केली आहे. भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी या प्रयत्नाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी चे अंतर्गत गट सर्व पक्षीय पॅनेलच्या माध्यमातून सामोरे जाण्याची तयारी करु लागले आहेत. त्यांना भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी सर्व रसद पुरविण्याचे मान्य केल्याने इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. या निवडणूकीचे परिणाम आगामी जिल्हा परिषद, महापालिका तसेच विधानसभा निवडणूकीत भाजपला मदत होण्याची शक्यता असल्याने बाजार समितीची निवडणूक खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी ची चिंता वाढू लागली आहे. राष्ट्रवादी च्या अंतर्गत गटानेच आता भाजपशी जुळून घेऊन सर्व पक्षीय पॅनेल तयार करण्याचे प्रयत्न चालू केल्याने राष्ट्रवादी यापुढे पाऊले जपून टाकणार का ? पुन्हा ठेचा खाणार म्हणून राष्ट्रवादी चे निष्ठावंत बोलत आहे.
जित्रांबाना उमेदवारी मिळणार का ?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेकवेळा आपल्या जाहीर कार्यक्रमातून राष्ट्रवादी च्या हवेली बाजार समिती व यशवंत कारखान्यातील मंडळींनी संस्था बुडविल्या म्हणून आरोप करीत या तत्कालीन संस्थांच्या संचालकांना जित्रांब म्हणून समाचार घेतला आहे. मात्र ही सर्व मंडळी राष्ट्रवादीत आहे. अशावेळी अजित पवार यांचा पक्षाचा पॅनेल झाल्यास या लोकांना संधी नाकारणार का ? म्हणून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.