शेतजमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणांमध्ये फसवणूक; एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.! दौंड तालुक्यातील घटना..


दौंड : पुनर्वसित दोन एकर जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणांमध्ये पूर्वी दस्त करूनही फसवणूक झाल्याने एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना (ता. १२) मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

लखन हरिभाऊ कोऱ्हाळे (वय ३२,रा. हिंगणीबेर्डी, ज्योतीबानगर, ता. दौंड, जि.पुणे) असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखन कोऱ्हाळे या तरुणाने आत्महत्येपूर्वी आपण जीवन संपवत असल्याचे कागदावर लिहून त्याचा फोटो गावातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केला होता. या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींची नावे लिहिले होते.

हिंगणीबेर्डी पुनर्वसित गट नंबर असा फक्त उल्लेख करत गावातीलच जमीन खरेदी व विक्री करणारे, त्याचबरोबर व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या अशा १५ व्यक्तींसह केडगाव परिसरातील जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटाच्या नावाच्या उल्लेखासह रजिस्टर मॅनेज केल्याचा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे.

दरम्यान, कोऱ्हाळे याने व्हॉट्सअ‍ॅपवर आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी शेअर केल्यानंतर मित्र, नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, रात्री उशिरा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लखन याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. दौंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!