कल्याण-कर्जत लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! विशेष ब्लॉकमुळे सेवा बंद; ४ एक्स्प्रेसचे मार्ग वळवले..

मुंबई : कल्याण ते बदलापूरदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग आला आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्री विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. अप आणि डाउन मार्गावर रात्री १.४० ते पहाटे ३.४० या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकदरम्यान कल्याण ते कर्जतदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा रद्द राहणार आहेत. तसेच रात्री उशिरा धावणाऱ्या काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.

ब्लॉक का घेण्यात येणार?

उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील बांधकामांचे लोखंडी सांगाडे हटवण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. उल्हासनगरमध्ये सांगाडा हटवण्यासाठी ३०० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन, तर अंबरनाथमध्ये ८० मेट्रिक टन क्षमतेची क्रेन वापरण्यात येणार आहे.

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कधी?
ब्लॉकपूर्वी शनिवारी सीएसएमटी ते बदलापूरदरम्यान शेवटची लोकल रात्री ११.५१ वाजता सुटेल. तर सीएसएमटी ते कर्जतदरम्यान शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता धावेल. बदलापूरहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.२९ वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल कधी?
ब्लॉकनंतर ठाणे ते कर्जतदरम्यान पहिली लोकल मध्यरात्री १२.०५ वाजता सुटणार असल्याचे वेळापत्रकात नमूद आहे. तर कर्जत ते सीएसएमटीदरम्यान पहिली लोकल पहाटे ३.३५ वाजता आणि अंबरनाथ ते सीएसएमटीदरम्यान पहिली लोकल पहाटे ३.४३ वाजता धावणार आहे.
चार एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले
विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉकमुळे चार एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. यामध्ये भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि होस्पेट एक्स्प्रेसचा समावेश आहे.
या गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे मार्गे वळवण्यात येणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
