बंद दरवाज्यांआड सुरू होता काळा धंदा; बनावट ग्राहक पाठवत पोलिसांनी उघड केलं पुण्यातील रॅकेट

पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका लॉजमध्ये सर्व काही सामान्य सुरू असल्याचा आव आणला जात होता. मात्र बंद दरवाज्यांआड सुरू असलेल्या कथित देहविक्रीच्या व्यवसायाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने टाकलेल्या अचानक धाडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, एका एजंटला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात राहणारा सचिन बाबुराव गायकवाड हा महिलांना लॉजमध्ये आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेत असल्याचा संशय होता. याबाबत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाईचे नियोजन करण्यात आले.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी आधी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर संशय पक्का होताच पुणे-सातारा रस्त्यावरील ‘द्वारका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग’वर अचानक छापा टाकण्यात आला. पोलिसांनी लॉजमधील विविध खोल्यांची झडती घेतली असता, चार महिला तिथे आढळून आल्या. त्यांची तत्काळ सुटका करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

दरम्यान, आरोपी सचिन गायकवाड याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात तो मूळचा लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुळज गावचा असल्याचे समोर आले आहे. काही काळापासून तो पुण्यात वास्तव्यास असून या अवैध व्यवसायात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, लॉज व्यवस्थापनाची भूमिका काय होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.