रविवारी रेल्वेने प्रवास करणार असाल, तर लक्ष द्या! पुणे स्टेशनवर ९ तासांचा मेगाब्लॉक; काही गाड्या रद्द, तर काहींचा प्रवास हडपसरपर्यंतच..


पुणे : येत्या रविवारी (११ ऑक्टोबर) रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुणे रेल्वे यार्डातील दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून ९ तासांचा विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉकचा परिणाम पुणे स्थानकावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांवर होणार आहे. काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात बदल करण्यात आले असून, काही डेमू गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ब्लॉक

पुणे रेल्वे यार्डातील डाऊन मिरज मुख्य मार्गिकेवरील डी.डी.एस. पॉईंटच्या उन्नतीकरणाचे काम ११ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. यासाठी रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सलग नऊ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.

या कालावधीत हडपसरच्या दिशेने ये-जा करणाऱ्या गाड्यांसाठी फलाट क्रमांक २ उपलब्ध नसेल. तसेच, सासवड रोडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांना फलाट क्रमांक २ आणि ३ चा वापर करता येणार नाही.

दोन डेमू गाड्या रद्द; लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही बदल

मेगाब्लॉकमुळे सातारा-पुणे डेमू (गाडी क्रमांक ०७४२०) आणि पुणे-दौंड डेमू (गाडी क्रमांक ०७४०७) या दोन गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे स्थानकावर फलाट उपलब्ध नसल्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या अंतिम स्थानकातही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, जयपूर-पुणे एक्सप्रेस (१२९४०) आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस (१२१२७) या गाड्या खडकी स्थानकावरच थांबतील.

तर नागपूर-पुणे एक्सप्रेस (१२१३६), जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस (११०७८) आणि अमरावती-पुणे एक्सप्रेस (११४०६) या गाड्या हडपसर स्थानकापर्यंतच धावतील.

याशिवाय, बारामती-पुणे डेमू (गाडी क्रमांक ०७४०६) ही गाडी पुणे स्थानकापर्यंत न येता केवळ दौंड स्थानकापर्यंतच धावणार आहे.

प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन

रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि अंतिम स्थानकाची माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन पुणे रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ आणि प्रवासातील गैरसोय टाळता येऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!