येरवड्यातील ‘भाई’ चा वाढदिवस करणे पडलं महागात, ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल..!!

पुणे : येरवड्याच्या तुरुंगात असलेल्या भाईचा भर रस्त्यात बर्थडे साजरा करणे त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या कार्यकर्त्यांनी भाईचा बर्थडे साजरा करण्यासाठी येरवडा कारागृहाची प्रकृती असलेला केक तयार करून आणला आणि या केकवर स्वयंघोषित भाईचा फोटो लावून भर रस्त्यात केक कापला होता.

सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आता या पंटर लोकांवर कारवाई केली आहे. हा संपूर्ण प्रकार चंतु:श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनता वसाहत जनवाडी परिसरात घडला असून ओम बुरुड उर्फ सोनू, अनिकेत कातुर्डे उर्फ मन्या,युराज बोराडे उर्फ बाळा,अनिकेत धोत्रे, विशाल रत्नाकर या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीधर विश्वास शिर्के यांनी चंतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनवादी परिसरात रेकॉर्ड वरील आरोपी शुभम प्रदीप शिरकर सध्या येरवडा कारागृहात आहे. दरम्यान एक जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपींनी भर रस्त्यात गर्दी जमवून त्याचा वाढदिवस साजरा केला.

एवढच नाही तर येरवडा कारागृहाची प्रकृती असलेला केक बनवून तो केक तलवारीने कापून भर रस्त्यात वाढदिवस साजरा केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर चंतु:श्रुंगी पोलिसांनी तातडीने याची दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली आहे.
