“मी तुझ्याशी सौंदर्यासाठी नाही तर पैशांसाठी लग्न केलं”, दोन महिन्यांत संसार उद्ध्वस्त; तेजश्रीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

मुलगी सासरी सुखी राहावी, तिला श्रीमंत आणि सुरक्षित घर मिळावं, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. याच स्वप्नासाठी अनेक पालक कर्ज काढून, आयुष्याची पुंजी खर्च करून मुलीचं लग्न थाटामाटात लावून देतात. मात्र आंध्र प्रदेशातील एका घटनेने या विश्वासालाच तडा दिला आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत तेजश्री नावाच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्रीच्या आई-वडिलांनी श्रीकाकुलम जिल्ह्यातील अरगोलू येथे राहणाऱ्या दप्पा सोमेश्वर राव याची वर म्हणून निवड केली होती. सोमेश्वरने आपण विशाखापट्टणम डॉकयार्डमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले होते. तसेच रामा टॉकीज परिसरात स्वतःच्या मालकीचे महिला हॉस्टेल असून त्यातून दरमहा दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा त्याने केला होता. त्यामुळे तेजश्रीच्या कुटुंबीयांनीही तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि चांगल्या घरातील मुलगा असल्याचा विश्वास ठेवला.
६ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात दोघांचा विवाह पार पडला. मुलीच्या आई-वडिलांनी कर्ज काढून लग्नासाठी मोठा खर्च केला. हुंडा म्हणून १८ लाख रुपये रोख, १९ तोळे सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू देण्यात आल्या. एकूण जवळपास २८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सोमेश्वरचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोप आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याने तेजश्रीला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, “मी तुझ्याशी सौंदर्यासाठी नाही तर पैशांसाठी लग्न केलं.” त्यानंतर हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.

दरम्यान, तेजश्रीने आत्महत्या केल्याचा दावा पतीकडून करण्यात आला. मात्र पोलिसांना तिच्या शरीरावर जखमांचे निशाण आढळल्याने हा मृत्यू संशयास्पद असल्याचे मानले जात आहे. प्राथमिक तपासात ही हत्या असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आरोपी सोमेश्वरचे इतर महिलांशी संबंध असल्याची माहितीही पोलिस तपासात समोर आली असून, यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणामुळे हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.