उन्हाळ्यातही कसं ठेवाल स्वतःला कूल

उरुळी कांचन :उन्हाळा तापण्यास आता सुरुवात झाली आहे. सूर्य आपली त्वचा कोरडी करण्याचं काम अगदी जोमाने करतोय, आपल्या शरीराचं तापमानही झपाट्याने वाढतंय. याशिवाय आपण गॅस, सूज, सुस्ती या समस्यांनाही सामोरे जातोय. आपण जर कमी प्रमाणात पाणी पिलं तर शरीराचं तापमान वाढतं. अशावेळेस शरीराला थंड ठेवणं हेच शहाणपणाचं ठरेल. शरीरातील उष्णता कमी करण्यास उपयुक्त पदार्थ :
सब्जा : सब्जा किंवा तुळशीचं बी हे नैसर्गिक थंडावा निर्माण करणारं आहे. ते अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. थंड दुधात गुलाबाच्या सरबतात मिसळून खा.
कांदा :कच्चा कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. याशिवाय कच्चा कांदा कोशिंबीर किंवा चटणीत वापरूनही तुम्ही खाऊ शकता.
आंबा :उन्हापासून संरक्षण करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे कैरी. कैरीत भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असतं. कैरी शरीरातील आयोडिन व लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करते.
मसाले : काही मसाले थंड गुणधर्माचे असतात, त्यांचा उन्हाळ्यात अधिक प्रमाणात वापर करा. जिरे, वेलची, चंदन, बडिशेप, केसर हे घटक शरीराला थंड ठेवण्याचं काम करतात.
मनुक: भिजवलेली काळी मनुका थंड दुधाबरोबर सेवन करण्यानेही उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
गुलकंद : गुलकंदामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच याशिवाय थकवा, सुस्ती, सांधेदुखी आणि उष्णतेशी संबंधित विकारही कमी होण्यास मदत होते.
द्रव पदार्थ :दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणं आवश्यक आहेच. याशिवाय नारळ पाणी, फळांचा ज्यूस, ताक यांचं सेवनही जरूर करा.
फळं आणि भाज्या : बहुतांश फळं व भाज्या शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात. म्हणून उन्हाळ्यात काकडी, कलिंगड, अननस, द्राक्षं, खरबूज यांचं सेवन भरपूर प्रमाणात करा. अर्धा ग्लास डाळिंबाच्या ज्यूसमध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिसळून प्या. शाकाहाराला प्राधान्य द्या. खूप आंबे खाण्याने शरीरातील उष्णता वाढते. म्हणून एकाच दिवशी खूप आंबे खाऊ नका.
दररोजच्या आहारात गरम मसाला, मेथ्या, मोहरी, लाल मिरणी यांचा वापर टाळा. हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात.
हे पण लक्षात ठेवा
कॅफिनयुक्त पदार्थांची कमीत कमी सेवन करा. कॅफिन आणि अल्कोहोल जास्त युरिन तयार करतात. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी घटते. आंबट, मसालेदार व तेलकट खाणं टाळा. मसाला, आंबवलेले पदार्थ आणि तळलेलं खाणं पूर्णतः बंद करा. मटन, चिकन आणि मासेही उन्हाळ्यात खाणं त्रासदायक ठरू शकतं.