पुणे शहर परिसरात आज जोरदार पावसाचा इशारा…
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता आहे. आज पुणे व परिसरात मेघगर्जना, जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
पुण्यात काल तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क येथे १.५ मिलिमीटर आणि १ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तसेच ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावली.
रविवारी पुण्यात झालेल्या जोरदार पावसानंतर मात्र सोमवारी ढगाळ वातावरणाचे सावट अधूनमधून पाहायला मिळत होते. पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणाचे सावट कायम राहण्याची चिन्हे सध्या आहेत.
दरम्यान, देशात यंदा मान्सून उशीरा दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे अद्याप मान्सून केरळातच दाखल झालेला नाही.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण मान्सूनचा मुहूर्त हुकला. कारण ६ जून पूर्वीच हा मान्सून महाराष्ट्रात येईल असा जो अंदाज होता, सुरुवातीला तर तो दोन जून रोजीच मोसमी पावसाचे आगमन होईल असेही संकेत होते, परंतु प्रत्यक्षात आता दहा जून नंतरच केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल असा नव्याने अंदाज आहे.