तिच्यासोबत लग्नाची स्वप्नं पाहिली; मात्र ‘त्या’ अटीमुळे 19 वर्षीय तरुणाने संपवलं आयुष्य, सांगली हादरली

सांगली : सांगली शहरात लग्नासाठी धर्म परिवर्तनाची अट घालण्यात आल्याच्या कथित कारणावरून 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मृत तरुणाचे नाव दुर्वांक प्रमोद शेवाळे (वय 19) असे आहे. तो पुण्यात नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो सांगलीतील आपल्या घरी आला होता. त्याच दरम्यान त्याची ओळख मूळ कोल्हापूर येथील एका तरुणीशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, लग्नासाठी संबंधित तरुणीने धर्म परिवर्तन करण्याची अट घातल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. या कारणामुळे दुर्वांक काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. गुरुवारी दुपारी दोघांमध्ये फोनवर या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर नातेवाईकांनी दुर्वांकच्या मोबाईलमधील आणि कुटुंबीयांकडे असलेल्या चॅट्समध्ये धर्म परिवर्तनाच्या अटीसंदर्भातील संभाषण असल्याचा दावा केला आहे. हे पुरावे पोलिसांना दिल्यानंतरही अपेक्षित तपास होत नसल्याचा आरोप त्यांनी केला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सांगली शहर पोलीस करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण आणि सर्व परिस्थितीचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.