हवेली बाजार समितीच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षां समोरच पदाधिकाऱ्याने दाखविला पक्षाला आरसा ! ‘सोरतापवाडी’ तील बैठक आटोपती घेऊन पदाधिकाऱ्यांनी काढता पाय…! 


उरुळी कांचन : जयदीप जाधव 

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तब्बल १९ वर्षाच्या कालखंडानंतर लागलेल्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र पक्षामार्फत निवडणूक लढविण्यासाठी गाव निहाय पक्षाचा दौरा आयोजित केला आहे. राष्ट्रवादी कडून अद्याप पक्षाचा पॅनेल उभा करण्यासाठी चाचपणी सुरू असताना या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी च्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याने सोरतापवाडी (ता.हवेली) येथील बैठकीत तालुकाध्यक्ष सह व पदाधिकाऱ्यांना सुणावल्याने पक्षाला आपली बैठक आटोपती घेऊन बैठकीतून पाय काढावा लागल्याने या बैठकीत पक्षाच्या यापूर्वीच्या निर्णयांना पदाधिकाऱ्यानेच थेट आरसा दाखविल्याने या बैठकीची चर्चा सुरू झाली आहे.

 

राष्ट्रवादी ने हवेली तालुका बाजार समितीसाठी स्वतंत्र पॅनेल उभे करुन निवडणूक लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. मात्र अद्याप सर्व निर्णय तळ्यात-मळ्यात आहेत. वरिष्ठ नेत्यांनी अद्याप जाहीर भूमिका न घेतल्याने राष्ट्रवादी च्या पॅनेल बाबत संभ्रमावस्था आहे. याउलट राष्ट्रवादी च्या काही तालुक्यातील नेत्यांनी भाजपशी जवळीक करुन सर्व पक्षीय पॅनेल मार्फत निवडणूक लढविण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. या नेत्यांनी भाजपशी जवळीक साधत राष्ट्रवादी पासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. अशातच अर्ज भरण्याचा टप्प्यापर्यंत निवडणूक आल्याने राष्ट्रवादी ने निवडणूकीसाठी तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गाव भेट दौरा आयोजित केला आहे.

 

राष्ट्रवादी च्या या दौऱ्यात सोरतापवाडी येथे पक्षाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर , शेखर म्हस्के यांच्यापुढेच पदाधिकाऱ्याने पक्षाच्या तालुक्यातील यापूर्वीच्या भूमिकेला खडेबोल सुणावल्याने या बैठकीची एकच चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे सहकार आघाडीचे जिल्ह्यध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी राष्ट्रवादी ने यापूर्वी घेतलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅक निवडणूक ‘अ’ वर्ग सोसायटीच्या मतदारसंघातून अनेक वर्षे घेतलेल्या मैत्रिपूर्ण लढतीवर जाब विचारला आहे.

 

पक्षाने यापूर्वी सहकारातील निवडणूकीत सोईस्कर भूमिका घेत पक्षाची ही आवस्था निर्माण केली आहे.विरोधी सर्वपक्षीय तयार झालेला पॅनेल पक्षाच्या लोकांचा असून त्यांच्याविरोधात काय निर्णय घेणार आहे असा सवाल उपस्थित केला आहे.एवढ्यावर हे पदाधिकारी थांबले नसून सर्वपक्षीय पॅनेल हा बलाढ्य झाला असून पक्षाच्या पॅनेलचा निभाव लागेल का असा प्रश्न उपस्थित करुन केवळ आमदार अशोक पवार वगळता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हे नेते वेळ देत नाही, सुखा : दुखात सहभागी होत नाही,निवडणूक आली की,पदाधिकारी आठवतात असा घरचा आहेर दिला आहे. हे सर्व उद्गार कानी पडताच राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांनी बैठक आटोपती घ्यावी लागली असून सभेतून पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा रंगली आहे.

 

राष्ट्रवादी निष्ठावंत पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र ?

हवेली तालुक्यात हवेली बाजार समितीची १९ वर्षानंतर तर कारखान्याची ११ वर्ष निवडणूका झाल्या नाहीत. या सहकारी संस्थांत प्रशासकीय राजवट असताना राज्यात राष्ट्रवादीची सत्ता होती. तरीही या संस्थेच्या निवडणूका लावण्याची भूमिका पक्षाने सत्तेत घेतली नाही. तसेच बंद यशवंत कारखान्याला प्रश्न सोडविला नाही असा पदाधिकाऱ्यांना राग आहे. या ऊलट भाजपने राज्यात सत्तापरिवर्तन होताच, बाजार समितीला पूर्वीचे कार्यक्षेत्र देऊन निवडणूक लावण्यात हातभार घेतला आहे. तर कारखाना प्रश्नात भूमिका घेतली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी केवळ संस्थांवर सत्ता मिळण्यासाठी धावपळ करीत असल्याचा रोष पक्षाचे पदाधिकारी खुलेआम बोलत आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!