Harshvardhan Patil : अजित पवारांची भूमिका फसवणारी, हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार? कार्यकर्त्यांची मागणी, बावड्यात होणार मोठा निर्णय…

Harshvardhan Patil : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापुरातून आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत. अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतोवाच केले आहेत. मात्र, महायुतीचं जागावाटप झाला का? असा संतप्त सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, गेली दोन महिने झाले मतदारसंघात फिरत आहे. मी विधानसभा लढवली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. काहीजण म्हणतात अपक्ष लढा, तर काहीजण म्हणतात ‘तुतारी’ हातात घ्या. पुढील काही दिवसांत जनतेत जाऊन मते जाणून घेणार आहे. महायुतीचा कोणताही निर्णय तीन नेत्यांनी एकत्र बसून घेतला पाहिजे. मागील आठवड्यात इंदापुरात शासकीय कार्यक्रम पार पडला. तेव्हा, आम्हाला बोलावण्यात आलं नाही. Harshvardhan Patil
आम्ही महायुतीचाच घटक आहोत ना? अजित पवारांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देणार असल्याचं सुतोवाच केले आहेत. मात्र, महायुतीचं जागावाटप झाला का? हे आमच्या नेत्यांना विचारणार आहे. कुणीही आमच्याशी बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहे. पण, त्याआधी जनतेशी संवाद साधणार आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आमची फसवणूक करतात…
दरम्यान, प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आमची फसवणूक करतात. विधानसभा निवडणुकीत शब्द देऊन देखील ते फिरवतात. यामुळे आता अजित पवार यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे सांगून कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे यावेळी दिसुन आले.