५० तोळे सोनं, २५ लाख हुंडा; काही महिन्यांतच छळ सुरू, मुलगी झाल्यानंतर वाद अन् भावाला शेवटचा मेसेज… पायलने का संपवलं जीवन?

पुणे : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात ३४ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पायल झांबरे असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता, तसेच मुलगी झाल्यामुळे तिला वारंवार टोमणे मारले जात होते, असा गंभीर आरोप तिच्या भावाने केला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लग्नात ५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये दिल्याचा दावा
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पायलचा विवाह १३ मार्च २०१९ रोजी अक्षय अरविंद झांबरे याच्यासोबत झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबीयांनी ५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये रोख दिले होते. लग्नाचा एकूण खर्च सुमारे ७० ते ८० लाख रुपये झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच पायलला सासरच्या मंडळींकडून पैशांची आणि सोन्याची मागणी करून त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. प्रत्येक सणाला माहेरहून पैसे आणि दागिने आणण्यासाठी पती आणि सासूकडून तिच्यावर दबाव टाकला जात होता, असे भावाने फिर्यादीत म्हटले आहे.

मुलगी झाल्यानंतरही छळ केल्याचा आरोप
३० मार्च २०२३ रोजी पायलने मुलीला जन्म दिला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात येऊन मुलगी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मुलीचा सांभाळ करणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतरही मुलगी झाल्याच्या कारणावरून तिला वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू असल्याचे भावाने म्हटले आहे.
भावाला पाठवला होता शेवटचा संदेश
१ नोव्हेंबर २०२६ रोजी पायल माहेरहून सासरी परतली होती. त्याच रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी तिने आपला भाऊ ऋषीकेश याला संदेश पाठवून सासूला जबाबदार धरल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर भावाने पायलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने फोन उचलला नाही. पतीशी संपर्क साधल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप भावाने केला आहे.
मुकुंदनगरमधील फ्लॅटमध्ये आढळला मृत्यू
रात्री उशिरापर्यंत पायलशी संपर्क न झाल्याने माहेरच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ते मुकुंदनगर येथील झांबरे पॅलेस परिसरात पोहोचले. त्यानंतर संबंधित फ्लॅटमध्ये पायल आढळली. तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर पायलच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरे, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
