महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी…

छत्रपती संभाजीनगर : होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान आता चाळीशीच्याही पार गेलं आहे.
राज्यातील सोयगावमध्ये उष्माघातचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. . तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात ४९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे सरकल्याने हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
उष्माघात झाल्यास अनेकदा कूलिंग तंत्र वापरले जाते. थंड जागी बसून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला अनेकदा उष्माघातावर उपचार म्हणून दिला जातो, उष्माघातात व्यक्तीची स्थिती स्थिर करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.
उष्माघाताच्या लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर, बऱ्याचदा यामुळे व्यक्तीची स्थिती गंभीर बनू शकते. सुरुवातीला प्रचंड घाम येणे आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसून येतात. उष्माघात वाढू नये म्हणून त्वरित उपाय करावा. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावेत.
उष्माघाताची कारणे कोणती?
उन्हात अधिक वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काचेच्या कारखान्यात काम करणे.
उच्च तापमान खोलीत काम करणे.
यासोबतच खूप डार्क आणि घट्ट कपडे घातल्याने उष्णता अधिक जाणवते.
उष्माघातापासून असा करा बचाव..
उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा.
हलके आणि श्वास घेण्यासारखे कपडे घाला
उष्णतेच्या वेळी अधिक शारीरिक हालचाली टाळा
थंड ठिकाणी विश्रांती घ्या आणि शरीर थंड ठेवा
सीझन फ्रुट्स म्हणजेच संत्री, मोसंबी, टरबूज अधिक खा. काकडीचे सेवन करा.
डिटॉक्स वॉटर म्हणजेच पुदिना, लिंबू, अद्रक पाण्यात टाकून ते पाणी प्या.
पंखे किंवा वातानुकूल वातावरणात राहा